मा. कुलगुरूंचे मनोगत

Sanjiv Sonawane Hon. Vice Chancellor YCMOUआपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून (निसर्गातून) होत असते हे आपल्याला माहिती असूनसुद्धा पर्यावरण संवर्धनाकरीता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. उलट पर्यावरणामध्ये उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थीवृत्तीमुळे पर्यावरणाचे संतूलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरुकता न झाल्यास येणार्‍या काळात गंभीर समस्यांना समोरे जावे लागेल यामध्ये कोणतेही दुमत नाही.

पर्यावरणामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर मानवाने आपल्याबरोबरच इतर सजीव घटकांचा विचार करुन केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही व भविष्यात येणार्‍या पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. परंतू सद्दस्थिती लक्षात घेता पर्यावरणीय समस्या दिवसें-दिवस वाढत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हानी होताना दिसत आहे. पर्यावरणातील प्रत्येक सजीव घटकाचे संवर्धन करणे ही आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे विसरुन चालणार नाही. जनजागृती म्हणून आपण प्रत्येकाने सहभागी होऊन अथवा पर्यावरण सामाजिक संस्थामध्ये सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडल्यास पर्यावरणाचे संरक्षण होण्यास मदत होईल.

मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धीमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे. हे विसरता कामा नये नैसर्गिक पर्यावरणात बदल घडवण्याची क्षमता केवळ मानवाकडे आहे. त्यामूळे पर्यावरणातील प्रत्येक घटकांचे संरक्षण करणे, त्याचा काळजीपूर्वक वापर करणे मानवाचे आद्यकर्तव्य आहे. हे आपण ओळखले पाहिजे व पर्यावरणाचे रक्षण म्हणून प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन त्याचे संवर्धन करावे व इतरांनाही प्रोत्साहित करावे. पर्यावरण वाचवा! जीवन वाचवा! देश वाचवा! या उक्ती प्रमाणे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज झाली आहे.

आपल्या विद्यापीठाच्या “एक विद्यार्थी एक वृक्ष” या प्रकल्पात सहभागी व्हा.

मा. प्रा. संजीव सोनवणे,

माननीय कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक