संकल्पना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत.

वृक्ष म्हणजे जीवन - वृक्ष देतात फुले फळे  !
वृक्ष देतात - पाउस, पाणी,  थंडावा, वृक्षच देतात अन्न वस्त्र आणि निवारा !
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वृक्ष शोषून घेतात वातावरणातला कार्बन.... त्यामुळे जास्तीत जास्त वृक्ष लावण्यासाठी पुढे आलं पाहिजे ''आपण'' !! वृक्ष लावून...पृथ्वीला संजीवनी द्यायची आहे आपण. म्हणूनच - आपलं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ  घेऊन येतंय एक  नाविन्यपूर्ण उपक्रम ....  ''योसो'' अर्थात
YCMOU’s One Student One Tree

हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे,
कृतार्थ जीवन या वृक्षांचे,
प्राणवायूचे कोष धरेचे !
plantation

या उपक्रमात -  प्रत्येक विद्यार्थ्यांनी लावायचं आहे एक झाड !! ... त्याचं पालन पोषण करून जोमाने  वाढवायचं आहे....!  या माध्यमातून पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे...!! आणि हे सर्व यशस्वीपणे केल्यावर तुम्हाला मिळणार आहेत प्रोत्साहन गुण ह्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची आखणी करण्यासाठी, ही संकल्पना मांडणारे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली गेली. या समितीने संपूर्ण योजनेला आकार दिला. आपल्या सर्वांच्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आनंदी भविष्यासाठी या प्रकल्पात सहभागी व्हा.

जागतिक स्तरावर पर्यावरण विषयी केल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये वृक्ष लागवड हा सर्वत्र प्राधान्य क्रमाने हाती घेतलेला उपक्रम आहे. असाच एक उपक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने हाती घेतला आहे.

या उपक्रमाचे शीर्षक "य.च.म.मु.वी. – एक विद्यार्थी – एक वृक्ष" (YCMOU – One Student One Tree अर्थात YOSOT ) असे आहे.

या उपक्रमा अंतर्गत या विद्यापीठाचे विद्यार्थी प्रत्येकी एका वृक्षाची लागवड करतील. विद्यापीठाने या प्रकल्पासाठी विकसित केलेल्या मोबाईल एप्लिकेशनवर विद्यार्थी सदर लागवडीचे छायाचित्र अपलोड करेल. या छायाचित्रासह वृक्ष लागवडीच्या स्थळाची आपोआप नोंद होईल. त्यासाठी जी.पी.एस. प्रणालीचा तांत्रिक वापर केला जाईल. विद्यार्थी त्याने लागवड केलेल्या वृक्षाची जोपासना करेल. त्याची खात्री म्हणून तो दर महिन्यास विशिष्ट तारखेपूर्वी लागवड केलेल्या वृक्षाचे छायाचित्र अपलोड करेल. असे सलग सहा महिने जोपासना करणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या अंतिम परीक्षेच्या गुणांमध्ये प्रोत्साहन काही गुण दिले जातील. (त्यासाठी तक्ता बघा)